रे मना सांभाळ हे ध्यास सारे....
प्रकाशाच्या मंदावलेल्या वेळा अधिकच सुस्तावतात.. क्षितिजावरचा शेवटचा केशरी ओघळ अजूनही रेंगाळतो..निशेच्या गूढ छटांमधे विरघळतानाही स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी चाललेला किती हा अट्टाहास!!
मनाचही तसंच असतं ना जेव्हा ते रमतं सुखद आठवांच्या क्षणांमधे...रेंगाळत रहातं या केशरी ओघळासारखं त्या पुसलेल्या आठवणींच्या खुणा जपण्यासाठी.. मनाच्या वाळूवर कितीएक अक्षरांनी कोरलेली आठवणींची शिल्पं तशीच असतात ताटकळत उभी असतात त्यांचे आकार धरून, रंग धरून स्वतःला जपत.....!!
वर्तमानाच्या लाटा किती प्रयत्नशील असतात या स्मृतीशिल्पांना विस्कटून मोडायला.एकावर एक नवीन लाटा मनाच्या किनाऱ्यावर आदळतात, फेसाळत जुन्या खुणांचा रंग पुसण्यासाठी.... पण काही शिल्पं खूप दृढ असतात..काही स्वप्नं फक्त स्वप्नं नसतात..काही आठवणी फक्त आठवणी नसतात भूतकाळात विरून जाणा-या....तर त्या असतात श्वास वर्तमानाचे....ध्यास घेऊनच पाय रोवून उभ्या असतात या आठवणी, ही स्वप्नशिल्पं...त्यांना वेध असतात उषःकालाचे....ओढावलेल्या रात्रीचा गूढ रंग, वर्तमानाचा आवेग त्यांचं अस्तित्व संपवू शकत नाही...भविष्याच्या पहाटेचा सोनेरी कळस त्यांना हवा असतो आणि त्या जपत असतात विस्कटलेली शिल्पं लिंपून लिंपून पुन्हा पुन्हा धीर देत...लाटांना धुडकावत....अंधकाराला फेटाळत जपलेला असतो केशररंग...स्वप्नांना सत्यात परिवर्तित करण्यासाठी....
पापणीच्या काठावर उगवलेली रोपं पुन्हा पुन्हा शिंपडावी लागतात अश्रूंनी..हिरवीगार होण्यासाठी.. फुलण्यासाठी....ऋतू पुन्हा बहरेल , पानगळ ओसरेल...पुन्हा वसंत येईल....आजुबाजुचं थांबलेलं जग पुन्हा चैतन्यमय होईल...उंच उंच लाटांवर अलगद स्वार होता येईल...त्यांच्या फेसाळण्याने वाळूची शिल्पं मोडणार नाहीत...निशेचा गूढ रंग मावळून जाईल.....आणि ओठांवर पुन्हा उमटेल तीच स्मित रेघ हवीहवीशी....स्वप्नातली सोनेरी शिल्पं आकारतील प्रत्यक्षात............. !
फक्त, रे मना सांभाळ हे ध्यास सारे....आभास नाही ना कल्पनेचे किनारे... वसू दे तुझ्या अंतरंगी वसा रे ..
लिना यादव...
(..सौख्यसंजीवनी🌹🍀)
२५.१२.२०२१
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा