घोरकष्टोद्धारण श्लोक चौथा
।। श्री गुरुदेव दत्त ।।
।।घोरकष्टोद्धारण दत्तप्रितीकारक स्तोत्र ।।
~ श्लोक चौथा
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता ।
त्वत्तो देव त्वं शरण्योsकहर्ता ।।
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते ।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।।४।।
अर्थ - हे देवा, तुझ्याहून दुसरा कोणी त्राता नाही. तुझ्यासारखा कोणी दाता आणि पाठीराखाही नाही.तूच दुःखहर्ता आहेस.हे अत्रेया, तुझा अनुग्रह होताच सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात.तू माझ्या वरही अनुग्रह कर..तूच या घोर संकटातून माझा उद्धार कर.तुला माझा नमस्कार असो.
भावार्थ -
श्लोक म्हटल्यावर क्षणभर थांबून विचार केला..की आधीच्या ओळीतही हेच म्हटले होते ना.तूच सर्वस्व आहेस मग काय अभिप्रेत असेल इथे वेगळं.मग थोडा अधिक विचार करावा वाटते..स्तोत्र या शब्दाचा सोपा अर्थ स्तुती.. पण नुसतं स्तुती करून भगवंत प्रसन्न होईल का हो याचा विचार केला तर प्रत्येक ओळी ओळीवर मनन चिंतन करता येते.तर प्रत्येक ओळ ही नुसती पाठांतरासाठी पारायणासाठी नाही तर ती आचरणासाठीही आहे..तिचा अर्थबोध घेत आपले आचरणात कुठे चुकते आहे हे समजून घेणेही आवश्यक आहे..नुसत्या स्तुतीपाठातून भगवान साध्य व्हावा इतका तर तो सोपा नाही....
प्रपंचाकडेही अभ्यासाच्या दृष्टीने पहाण्याची खरतर इथे नकळत सूचना दिली आहे.ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात ना..लटिका व्यवहार सर्व हा संसार । वाया येरझार हरिविण ।।....या प्रपंचात आई,वडील, बंधू,पती असे अनेक त्राते आहेत असा एक समज आहे..पण विचार केला तर ..या किंवा अन्य कुठल्याही नात्यातील कोणाची सोबत कुठवर आहे हे आपण कधीच ठरवू शकत नाही..किंवा अनेक प्रसंगी सगळेअसूनही एखाद्या प्रसंगाला फक्त एक एकट्यानेच तोंड देणे भाग असते..वस्तुतः ते तसेच असते.पण तरीही सगळा पसारा घेऊन आपण जगतच असतो आणि एकाक्षणी आतापर्यंत केलेले सगळेच फोल ठरते.कधी व्यक्ती दगा देते तर कधी वेळ. अशा सर्व घटनांचा या ओळी म्हणताना निश्चित विचार करावा असे वाटते..
काळ बदलला आहे पत्नीची साथ गृहापर्यंत असते असे म्हणणारा हा काळ नाही पण एक रूढ म्हण आहे ना 'पत्नीची साथ गृहापर्यंत, जनाची स्मशानापर्यंत तर देहाची चितेपर्यंत...'त्या अर्थाने कोणाचीही सोबत शेवटपर्यंत नसतेच...आणि यापैकी कोणी त्राता आहे असेही नसते.प्रत्येक जीवाची जगण्याची सोय त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे आधीच ठरलेली असते..हे सारासार समजून घेतले तर, खरच रोजच्या जगण्यात आचरणात कुठे आणि किती गुंतावे हे विचार करण्यासारखे आहे.
मी कोणी निरूपणकर्ता नाही, प्रपंच आणि विरक्ती याचे विवरण करायला मी कोणी संतही नाही.कारण त्यांनी तर पुढचा रस्ता पार केला आहे.पण हा श्लोक म्हणताना हे संतांसाठी नाहीच हे माझ्यासारख्यासाठी आहे 'इतकेच' उमगून मनापासून म्हणतेय...
हे दत्तात्रेया, प्रत्येक जीवाची गती ठरवणारा तूच आहेस. समृद्धी देणारा ,पोषण करणारा तूच आहेस.तूच पालनकर्ता आहेस.तुझ्या सारखा तुझ्या विण अन्य कोणी माता ,पिता,भर्ता मला नाही..तुला मनोभावे शरण येणाऱ्या प्रत्येकाला तू योग्य मार्ग दाखवून त्याचा उद्धार करतोसच.तूच सगळ्या विवंचनेतून सोडवणारा आहेस..तूच माझेही रक्षण कर..हे दत्तात्रेया तुला माझा नमस्कार असो...
श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। कृष्णार्पणमस्तु ।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा