माये गोदावरी

 कातळावर पाय ठेवला आणि माझं वर्तमानच जणू बदललं..

क्षणार्धात समोर चित्र तरळलं डोळ्यासमोर..नदीच्या काठावर उभा असलेला श्रीराम हो रामच दिसतोय ना हा....सुंदर, उंच, रुंद देह..सतेज रूप.लांबसडक हात..मी पहातच राहिले हरखून त्या रुपाला भावविभोर होऊन....!!आजूबाजूला सगळं कसं रूप मनोहर दिसतय..प्रवाहाचं हे अनंत  वहाणं..त्यातलं मधुर संगीत..पहाटेचं धुकं..काठावरच्या झाडाफुलांची पानांची सळसळ....पक्ष्यांचं किलबिलणं..आकाशात सुंदर राजहंसांची रांग माळेसारखी विहरतेय....त्यांची फडफड भिरभिरणं  मला स्पष्ट ऐकू येतंय....प्रवाहाच्या एका संथ उत्तर कोपऱ्यात फुललेली निळसर कमलफुलं आतुरलीत श्रीरामाच्या पावलांवर स्वतःला वाहून घेण्यासाठी..तीही वा-याच्या मदतीने झुकतायत वारंवार काठाकडे, ओढल्यासारखी..... आणि तो रामही त्या नितळ वहात्या प्रवाहाकडे डोळेभरून पहातोय...त्याचं ते पवित्र रूप मीही डोळ्यात साठवतेय.खांद्यावर रुळणारे किंचित लांब केस.तो तेजस्वी चेहरा...सगळं समोर चलचित्रासारखं दिसतंय... न रहावून मी काहीशी पुढे सरकते..मनात किंचितशी जाणीव तरळली वर्तमानाची..फक्त किंचितच...

मी तर या काठावरच्या राऊळातील  मूर्ती पहायला आलेले ना ! तुझ्या मूर्तीसमोर नतमस्तक व्हायला श्रीरामा....! आणि हा असा तू समोर उभा दिसतोयस..मला जराही परकेपणा वाटत नाही.. मी पुन्हा काहीशी पुढे सरकतेय तुझ्या सदेह मूर्तीकडे.


तितक्यात मागनं कोणीशी एक स्त्री धावत आली...राम, राम..हाका मारत....जानकीच असावी..मी थबकले..


तेवढ्यात तिचा पाय कातळात कुठल्यातरी खाचेत अडकला आणि किंचित मुरगळला. ती कळवळून तिथेच थांबली.. आणि तू तिची हाक ऐकताच तिच्या दिशेने किती तत्परतेने धावलास श्रीरामा.....!! जानकीच ना ती...!!तू तिला केलेल्या स्पर्शातून कळतय..जानकीच ती...तिची कळवळ तुझ्या चेहऱ्यावर उमटली..तुझा एक हात तिच्या खांद्यावर ठेवत... दुसऱ्या हाताने तिचा हात हातात घेत किती मायेने पहातोयस तू तिच्याकडे..... तुझी लांबसडक बोटं तिच्या बोटात सहज गुंफली गेली...तिच्या चेह-यावरच्या त्या कळा क्षणात विरल्या आणि एक पूर्ण समाधान विलसलय नजरेत..अचानक चेहरा खुलला..किती हे विलोभनीय  दृश्य.... तिचा हात हातात घेऊन तू अलगद कातळावरून पुढे चालू लागलास....आणि तो अडखळता पाय, ती इवलीशी ठेच जणू साताजन्माची पुण्याई घेऊन आलीय तिच्यासाठी इतका तो सुखद क्षण ...ते दिसतंय जाणवतंय तिच्या आविर्भावातून...सुखावलेले संपृक्त क्षण..आनंदाने ओतप्रोत.इतकी काळजी घेणारा हात हातात असला की बाकी सगळं जग फिकं होतं...पूर्ण तृप्ती हृदयात.. पूर्ण ब्रम्हांडांच चांदणं ओंजळीत..


एक क्षण माझे डोळे पाण्याने पूर्ण भरून आले...इतक्यात सगळं धुरकट झालं ते चलचित्र...दूर कुठेतरी धुक्यात ती श्रीरामाची आकृती विरून गेली...पुन्हा आताचा काठ दिसू लागला.....काठावरचं राऊळ ..त्या पाय-या...वर जायला हवं दर्शनाला..!!


माये गोदावरी, तुझं हे नदीपण मला दे .किती अनंत स्मृती तुझ्या या जलाक्षात, या डोहात सामावून घेतेस तू..तुझी ही अमर्यादता मला दे... इथे या काठावर उमटलेली पवित्र पाऊले श्रीरामाची ,ती लांबसडक बोटं तो आश्वस्त हात..ती मायेची नजर..अनुभवण्यासाठी या काठावर एक जन्म मला दे ...ही अशी एखादी कातळावरची ठेच मला दे.एक वनवास मलाही दे..


एक श्रीराम मलाही हवा. त्याच्या पावलाचा,लांबसडक बोटांचा स्पर्श होताच त्याच्या रूपात विरघळून जाण्यासाठी...ती आश्वासक तृप्तता अनुभवण्यासाठी...तुझं हे अनंतत्व मला दे....पुन्हा ते रूप पहाण्यासाठी इथे या काठांवर पुन्हा श्रीरामाची भेट होण्यासाठी...पुन्हा हो, पुन्हा भेटण्यासाठी...तुझं हे अनंतत्व मला दे.


लिना यादव....🍂

टिप्पण्या