कवितेच्या ओळी....

उर्मीतुन उठती लाटा लाटांवर झुलते स्पंदन

स्पंदातुन मुक्त उमलते शब्दांचे हिरवे चिंतन

फुलण्याचा ध्यास सुगंधी श्वासांच्या ओल्या भाळी

अन ओठांवरती येती कवितेच्या निर्मळ ओळी...

तृष्णेची एक शलाका तळपते अंतरंगात

अवकाश झळकते अवघे उजळते आतले चित्त

संपृक्त स्वरांच्या रांगा वृत्तीला देती टाळी

अन ओठांवरती येती कवितेच्या निर्मळ ओळी...

ग्रीष्मात तापली माती विरहाच्या तीव्र झळांनी

हिरवळली घोर प्रतिक्षा मन-भिजल्या मेघसरींनी

मौनाच्या नाजुक वेणा छंदाला देती हाळी

अन ओठांवरती येती कवितेच्या निर्मळ ओळी...

बेचैनी अव्यक्ताच्या व्याकुळते खोल तळाशी

श्रद्धेच्या यमुनाकाठी गहिवरती अक्षर राशी

क्षण एक बोलका होतो अश्रूंनी दुर्लभ वेळी

अन ओठांवरती येती कवितेच्या निर्मळ ओळी...

पानावर अक्षरमाया ओघळते कातरवेळी

अन ओठांवरती येती कवितेच्या निर्मळ ओळी....

लिना यादव

टिप्पण्या