घोरकष्टोद्धारण श्लोक पाचवा

 ।। श्री गुरुदेव दत्त ।।


।। घोरकष्टोद्धारण दत्तप्रितीकारकस्तोत्र ।।


~ आज या 'स्तोत्रपञ्चकातील' पाचवा श्लोक 


धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं ।

सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।।

भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते ।

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।।५।।


अर्थ - हे अखिलानंदमूर्ते श्री दत्तात्रेया, माझी बुद्धी,प्रीती जिथे धर्म आहे तिथे स्थिर होऊन सत्संगात माझी वृत्ती अखंड दृढ राहूदे. (भुक्ति) अर्थात दारिद्यादि संकटापासून मला नेहमी मुक्त ठेव.  माझी आसक्ती फक्त तुझ्या चरणी स्थिर कर.आणि मला सद्गती दे.तुला माझा मनःपूर्वक नमस्कार असून तू माझी या घोर संकटातून मुक्तता कर..


भावार्थ -


उपासनेसाठी लागणारे सूक्ष्म बारकावेच खरतर इथे प्रार्थनेतून मागितले आहेत. शुद्ध बुद्धीचे वरदानच मागितले आहे जेणेकरून अज्ञानातून येणारे अडथळे आपोआप नष्ट होतील. भक्तीचा स्वास्थ्यकारक प्रवास मागितला आहे आणि त्यासाठीच दारिद्यादि विवंचनेपासून मला दूर ठेव अशी प्रार्थना सद्गुरुंजवळ केली आहे. माझे मानसिक  तथा शारीरिक स्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी जितके किमान गरजेचे आहे तितक्या अन्नधान्य वस्त्रादि गरजांची पूर्तता नेहमी होऊदे अशी  विनंती ही केली आहे.कारण मी एक सामान्य व्यक्ती आहे.माझ्या सर्वसाधारण भौतिक गरजांच्या पूर्ततेसाठी माझ्या हातून कुठलेही दुष्कर्म घडू नये तर तुझ्या कृपेने मला उत्तम मार्गाने सौख्य लाभूदे हा त्यातला विनम्र भाव आहे..


लोभ,वासना,दुराचार यातून निर्माण होणारी दुर्बुद्धी विनाशाकडे नेते.अशा बुद्धीने व्यक्तीचे स्वतःचे तसेच समाजाचेही हीत होत नाही. इथे समाज म्हणजे त्या त्या व्यक्तीशी ज्या इतरांचे आयुष्य निगडित आहेत ते.. ती दुर्बुद्धी मला स्पर्शही न करो. 


सद्भभावना,सद्वृत्ती ही कशी असते तर माउलींच्या शब्दांत - जैसी दीपकळिका धाकुटी । परि बहु तेजाते प्रगटी ।।  छोटीशी दिव्याची वातही मोठ्या खोलीतल्या अंधाराला छेद देते.म्हणून

जी प्रामाणिकता,निर्लोभता मला सद्बुद्धी देते त्या धर्ममार्गावर माझी निष्ठा दृढ असूदे..आणि अशाच सदाचारी सद्बुद्धी व्यक्तींचा सहवास मला लाभो ..कारण सद्बुद्धी सद्भाग्याचे दार उघडत असते .वैयक्तीक तथा सामाजिक हीत जपण्यासाठी सन्मार्गाचाच उपयोग होतो..तर हे ईश्वरा अशी दृढ वृत्ती जी तुझ्या चरणी स्थिर राहील, अशी अचल निष्ठा तू मला दे.


माझ्या हृदयात तुझे निरंतर स्मरण रहाण्यासाठी माझ्या आतील आसक्तीलाही तुझा परीसस्पर्श कर जेणेकरून ती आसक्तीही तुझ्याच भावात लीन राहील..तुझ्या स्मरणानेच या संसारातून अखिल आनंदाची प्राप्ती होऊ शकते..तर हे अखिलानंदमूर्ते,  तुझ्या स्मरणाने मला यश जय लाभ मिळो आणि माझ्यावर आलेले अरिष्ट दूर होवो अशीच तुला विनम्र प्रार्थना करून मी तुला पुनःपुन्हा वंदन करते...

श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनम् ।।

प्रपठेन्नियतो भक्त्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत् ।। 


अर्थ- श्रीस्वामीमहाराज म्हणतात ,दत्तगुरुंच्या प्रेरणेतून निर्माण झालेले हे श्लोकपञ्चक कल्याणकारी आहे. याचे नित्यनियमाने भक्तीभावाने सद्वृत्तीने जो पठण करील तो भक्त 'श्रीदत्तप्रियोभवेत्' अर्थात तो दत्तप्रिय होईल.. दत्तगुरुंची सदैव कृपादृष्टी त्यावर राहील असे माझे आशीर्वचन आहे..


।।  इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वतीविरचितं घोरकष्टोद्धारण स्तोत्रं सम्पूर्णम् ।।


स्वामी ओम्....उद्या येणाऱ्या दत्तजयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा..


।।श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ।। कृष्णार्पणमस्तु ।।

टिप्पण्या