कांक्षा

 जेव्हा...


सुचते ना कविता ना सुचती मज ओळी

 ढवळते घोर मी, चित्त आतले जाळी....


तेव्हा जराजरा सुचलेले....🍂🍀


अलवार निखळतो हिरवळला शिनगार

थरथरे गुलाबी मोह लाजरा भार

देहात सळसळे स्निग्ध मिठीची कांक्षा

बिलगला चंद्र का ? धरा लांघते कक्षा


हा वेग नदीचा संथ कशाने झाला

की कुरवाळित ती प्रवाहात वाळूला

एकांत भोगतो डोह त्यागुनी भाषा

ना खुणा उमटती ना कुठल्याही  रेषा


शिशिरात बोचरा मत्त वाहतो वारा

घन निळ्या धुक्याचा वेढुन मुग्धपिसारा

आल्हाद विलसतो दिशादिशांच्या वक्षा

बिलगला चंद्र का ? धरा लांघते कक्षा


धमन्यात पसरते नशेत भिजली धुंदी

हा ऋतू मोकळा पानगळीची सर्दी

सांदीतुन निथळे ऊब हवीशी माया

बहरते प्रितीची लाजलाजुनी काया


देहात सळसळे स्निग्ध मिठीची कांक्षा

बिलगला चंद्र का? धरा लांघते कक्षा


लिना यादव

टिप्पण्या