आभार घोरकष्टोद्धारण स्तोत्र

 आभार कसे म्हणू.आभार म्हणताना नकळत स्वतःकडे क्रेडिट घेतल्यासारखं होईल. परंतु तुम्ही सगळ्यांनी घोरकष्टोद्धारण स्तोत्राच्या भावार्थाचा मनोभावे वाचनानंद घेतलात याचा अर्थ दत्तगुरुंचरणी सेवा पोहचली इतकेच म्हणेन..ब-याच मित्रमैत्रिणींनी अनेक समूहावर ते पुढे पोस्ट केले त्याबद्दल  मनापासून 🙏🏻🌹🙏🏻


मार्गशीर्ष महिना आला की आईची प्रकर्षाने आठवण होते.ती अगदी पावलोपावली सगळीकडे दिसू लागते.आईची जन्मतिथी आणि पुण्यतिथी दोन्ही मार्गशीर्षातच.ती जाऊन आता जवळजवळ  चोवीस वर्षे झाली..माझ्या वयाची अगदीच पंधरा सोळा वर्षे इतका अल्पसहवास लाभला मला तिचा..पण तिची आठवण खूप ठळक आहे हृदयात.तिचं देवभोळेपण,श्रद्धाळू जगणं,शांत स्वभाव हे इतक ठळक होतं मला तर त्या रुपाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही रूपात ती आठवत नाही. ती याहून वेगळी कधी दिसली नाही वागली नाही.. सकाळी लवकर उठलं की देवपूजा ,मुलं,स्वयंपाक या तीन गोष्टींचाच तिचा दिनक्रम.. नित्यनेमाने रांगोळी करणं छान देवपूजा करणं. वेळेत सौम्य साजुक  स्वयंपाक करणं हे इतकच तिला माहीत. स्वयंपाक आटपला की सतत पारायण स्तोत्रपठण हेच असायचं..किंवा अक्षरशः कित्येक वह्या नामस्मरणाने भरलेल्या असायच्या..संध्याकाळी दिवेलागणीला घोरकष्टोद्धारण स्तोत्र ती नेमाने म्हणायची तेही थोड मोठ्याने आम्हा भावंडांना ऐकू येईल असे आणि अर्थासहित..अजूनही बरचसं वाचनपठण नित्य उपवास चालूच असायचं.घरात सगळी पोथ्यापुस्तकं मनाच्या श्लोकांपासून ते अनेक छोटी स्तोत्रे कथा एकादशीमहात्म्य ,दत्तमहात्म्य,नवनाथ भक्तीसार ते अनेक अनेक..त्यामुळे नकळत हे संस्कार होत राहिले.


मार्गशीर्षात लक्ष्मीचे गुरुवार मग ती मांडणी त्यासाठीची तिची लगबग .मला फुलंपानं जमवून आणायला सांगणं .मला हेच आठवतं तिचं सगळं..तेव्हा डोंबिवलीत आम्ही जिथे रहायचो तो एरियाही थोडा शहराच्या मध्यभागापासून आडोशाला होता.आमच्या घराजवळ सगळं फार निवांत होतं..मस्त मागे कर्दळीच लांबच लांब पसरलेलं रान..त्याआधी पोटोदेवाचं मंदिर. मंदिर म्हणजे एका मोठ्या वडाच्या उंबराच्या तीन चार विस्तृत पसरलेल्या झाडांच्या पायथ्याशी मांडलेला थाट..पण ते सगळं देखणं होतं....आजूबाजूला तगर,अनंत, रानभेंडी कसली कसली रानफुले बरच काही वाढलेलं असायचं..फुलांची रेलचेल.. मी पाचप्रकारची पानफुलं आईला पूजेसाठी आणून द्यायचे.फार मजा असायची दूर्वा फुलं गोळा करणं..मी तर कर्दळीच्या चिखलात पाय रुतवून तीही फुलं तोडून आणायचे..... तर आई अशीच आठवते फुलापानातली,देवपूजेतली..तिला बाहेरच्या इतर सामाजिक गोष्टींशी इतकं घेणदेणं नव्हतंच.मुल ,नवरा देव्हारा, स्वयंपाकघर या चौकटीतलं आयुष्य.. अगदी शेजारणींशी फार चर्चा, इकडच्या तिकडच्या गप्पा करताना मी तिला कधीच पाहिलं नाही.. थोडाफार सुसंवाद यापलीकडे तिला बाहेरच्या जगाचं काही आकर्षण नव्हतं...


आईची मूर्ती आठवते ती ओट्याजवळ नाही तर देवघरासमोर.. तिच ते स्तोत्र म्हणणं अजूनही कानात गुंजतं जसच्या तसं..फार शुद्ध स्पष्ट उच्चारात वाचायची..शुद्ध उच्चार आणि वाचनावर फार भर असायचा..आमच्या अभ्यासावेळीही तसंच..


खरंतर वर्षानुवर्षे तिला हे स्तोत्र संध्याकाळी म्हणताना ऐकलं पाहिलं कदाचित त्यामुळे ही मला हा भावार्थ लिहावा असं वाटलं असेल..आणि गेली सात आठ वर्षे माझ्या नकळत मी अनेक दत्त भक्तांशी जोडले गेले..wapp प्रामुख्याने वापरात आलं तेव्हापासून. एक ओळखीचे विभाकर लेलेकाका आहेत.सहज एकदा गुगल करता करता त्यांच्या ' एका नाथसिद्ध योग्याचे आत्मवृत्त' आणि 'योगदा ज्ञानेश्वरी' या ग्रंथांशी (खंडांशी अधिक योग्य शब्द) परिचय झाला आणि आत्मवृत्ताची मराठी आवृत्ती किंडलवर का कुठे वाचून त्यांना संपर्क केला.फार भारावले होते त्यांच्या अनुभूती वाचून.. काका जवळपास ऐंशी वर्षाचे आहेत.पण फार आस्थेने बोलतात.. ते एक इमेल समूह तेव्हा चालवायचे .खरतर त्यात त्यांच्या सारखीच अनुभवी लेखक मंडळी नुसते लेखक नाही तर खगोलशास्त्रज्ञ, तज्ञ ,सर्जन अशी फार फार थोर मंडळी.पण मी वयाने अनुभवाने त्यांच्या पुढे शुन्य असतानाही त्यांनी अगदी फक्त मलाच तिथे सामावून घेतलं..बाकी सगळे निरुपणकर्तेच जणू इतक सुरेख नुसतं रोजचं संभाषणही ते करत...दुसरा विषयच नाही. ज्ञानेश्वरी किंवा तत्सम अनेक ग्रंथावर चर्चा लेखी ईमेल मधे..नंतर काकांनी wapp समूह केला सोप व्हावं म्हणून, तिथेही मी आहेच.. अगदी कोणीही तिथे admin म्हणून काही करत नाही. पण तरीही शांततेने फक्त आणि फक्त लेखनाचे कार्य चालू असते..कोणी कुठला उपक्रम जाहीर करत नाही.जो तो आपल्या आवडीने संस्कृत स्तोत्रांचा ,ज्ञानेश्वरी चा मुक्त अभ्यास करून ओव्यांचे सुलभ भाषांतर ,मराठी ओव्यांचे  संस्कृत भाषांतर ,संस्कृत कविताही तिथे पोस्ट करत असतात..या समूहावरच बहुतेक माझी गुरुदत्त आठल्ये,डॉक्टर विक्रांत तिकोणे इत्यादी विलक्षण ओढीने दत्तसेवा करणाऱ्यांशी ओळख झाली.. गुरुदत्त दादा आणि तिकोणे यांच्या मार्गदर्शनाने माझी गिरनार यात्राही झाली २०१८ला.. सांगायचा उद्देश हा की ही अशी सत्संगातील माणसं  सातत्याने आजूबाजूला आणून दत्तगुरुंनी मला त्यांच्या मार्गावर अलगद आणलय..येनकेनप्रकारेण कोणीतरी भेटतच असतं.....हा भावार्थ ही त्या ओढीतून लिहावासा वाटला..माझी खूप मोठी कसलीच साधना,योग्यता, अनुभव नसतानाही हे इतके घडतेय याने मी अंतरात खूप शांतता अनुभवते..की कुठेतरी तो ईश्वर आपल्याकडे सतत कृपादृष्टीने  लक्ष ठेवून आहे..अजून काय लिहू...हे सगळं आईकडून आलेलं आंदण ,छोट्याशा बीजाला हळूहळू कोंब फुटणं जसंकाही तसंच..... हे असंच मन जसं बोलतं तसं मांडलं साधंसं तुमच्यासमोर....पुन्हा एकदा तुम्हाला 🙏🏻🌹🙏🏻

टिप्पण्या