हृदयसंवाद....
नदीच्या आतूर प्रवाहाला प्रीतीसंगमाच्या घाटावर विराट सागरी लाटेने घट्ट कवेत घ्यावे हे तसेच काहीसे ..स्पंदनांच्या अनेक अदृश्य लहरींचे दृश्य रूप साकार होते आणि शब्दांशी मुक्त खेळ करते..प्रकटीकरणाचे सुख निराळेच असते..त्याला ना कशाची पर्वा ना कुठल्या सीमा.मन-स्पंदनांतून निर्माण होणाऱ्या अनंत लाटा तिचा डोह, त्या डोहाच्या खोलीचा ना थांग ना पत्ता.त्या लाटांना फक्त ओढ असते मुक्त मुशाफिरीची, अनंत अवकाशात स्वतःला झोकून देण्याची.....!
त्या विशाल सागराची जेव्हा पहिली प्रितीभेट झाली, ती अनुभूती पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी धडपडणारी 'इच्छा' पुन्हा त्या नदीसारखी कपारीतून नवीन जन्मायला तयार असते..पुन्हा हवा असतो तो प्रवास काट्याकुट्यातून, दगडगोटयातून, कडेकपारे ,उंच सखोल प्रदेशातून लांघत येणारा 'भेटीसाठी'.... हे असंच काहीसं आतल्या स्पंदांचं....!
त्या एका सागरमिठीने आयुष्याच्या वाटा मोरपंखी केल्या....सावळ्या देहाला निळा स्पर्श झाला आणि निळीसावळी माया ओथंबून आली..निर्मळतेच्या रंगाशी निळी सगुणमिठी, नक्षत्रदेशीचा प्रियकर आणि ब्रम्हांडाचा रथ...संवादांची स्वरपौर्णिमा तिथेच उमलते..तिथेच व्याकुळतेचे अरूप रूप सदेह साकार होते....तिथेच इंद्रधनुची कमान आहे एका नेत्रविभोर मार्गावर....तिथेच आहेत रामाच्या पाऊलखुणाही. सेतूच्या प्रत्येक दगडावर उमटलेल्या परीसखुणा..तिथपर्यंत पोचलं ना की उर्मींच्या कणाकणांची जानकी होते..आणि एक सोहळा रंगतो सृजनसोहळा...अव्यक्ताचा संवादिनीशी..!!........
लिना यादव
..सौख्यसंजीवनी🌹🍀
----------- ----------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा