मौनपक्षांची किलबिल....

 मौनपक्षांची किलबिल....


ती आहे आहे ,नाही नाही हे नक्की कळत नसताना मी काही काही लिहिलं होतं....कधी अर्धी ओळ,कधी पूर्ण कधी अपूर्ण. पण ती सारखी साद घालायची..धूसर धूसर उमटायची ..माझ्यातली कविता...! खूप खूप लिहायचं असायचं पण ते सगळं ब-याचदा डायरीतल्या तुरळक नोंदींपुरतच उमटलं, काहीसं विरून गेलं.आता आता मी फार लक्ष ठेवून असते माझ्या जाणिवांवर....मनातल्या उलथापालथींवर.....


मन वेल्हाळ वेल्हाळ, मन चिंब ओले ओले

मन स्वरूपाच्या रंगी ,आत्मरंगात नहाले........


माझ्याच एका खूप जुन्या कवितेच्या ओळी आहेत.काय काय लिहिले आहे मीच.....काल या अनेक लहान लहान ओळींची उजळणी करता करता आठवलं...आणि हे ही जाणवलं की खूप वाटतय पण मी लिहितेय हे माझं मलाच आधी कळलं नाही.....समोरच्या को-या अवकाशात अनेकदा नजरेनेच अक्षरं लिहिली जायची..ती तिथेच धुक्यासारखी विरघळूनही जायची... 


पण आतल्या  जाणिवा जागृत व्हायला तिचं पूर्ण दर्शन होणं गरजेचं होतं आणि हे घडलं अगदी आता आता..अचानक भुईला पाझर फुटावा तशी जाणीव प्रवाही झाली...लेखणी बोलकी झाली....तसंही मला लिहून बोलणे अधिक आवडते....

~

धुके सांडलेले मनाच्या तळाशी निळे मौनपक्षी तिथे नांदती

निळी झेप घेऊन आकाशवेडी गुपीते मनाची कुणा सांगती...


आणि ती पाखरं किलबिलू लागली मुक्त 'स्वानंदाच्या आकाशी'.

मला कविता आवडते ती मला तेव्हा पासून आवडते जेव्हा पासून मी कविता वाचायला शिकले..जेव्हा पासून रेडिओवर गीतमाला ऐकायला लागले.....घरच्या टेपरेकॉर्डरवर तासंतास  एकच आवडतं गाणं मला रिपीट मोडवर ऐकायला मला आवडायचं. आजही आवडतं, माध्यम बदलली आहेत इतकंच.....त्यातले वेगवेगळे पदर उलगडत रहायला आवडतं.....


ऑफिसहून परततानाचे कित्येक क्षण मला आठवतात..तू सदैव त्या सूर्यास्ताच्या वेळी  सोबत असायचीस..कानाला हेडफोन लावले की माझं बाहेरच्या जगाशी शून्य नातं...तिकीट काढून झालं की मुक्काम येईपर्यंत बसच्या खिडकीतून फक्त बाहेर बघायचं मावळत्या रंगांकडे ..!! 


ते रंग त्यात किती काही सामावलेलं असतं...अस्तित्वाचा ढळता रंग...की चांदण्यांच्या उदयाची आशा..थकलेल्या गात्रांना हवीहवीशी असलेली शांतता...की उगाचच उदासीनता आणणारी अंधुकता...प्रचंड प्रचितीचे अस्थिर बदलते, मावळते ध्यानरंग फक्त न्याहाळायचे.... बाकी सगळं धुरकट व्हायचं..सगळी रहदारी, गर्दी फिकट पुसट व्हायची..माझ्या लेखी त्यांचं कुठलं भान नसायचं..कानांवर आवडत्या गाण्याचे शब्द आणि मनात असंख्य आवर्तनं...ओळींवर ओळी कधी एकसंदर्भ कधी भिन्न भिन्न मी टिपत असायचे...


कविते, तू तेव्हा ही होतीस....आणि आज तू घट्ट सखी आहेस....तुझ्या- माझ्यातलं ते अंतर निवळून आता मात्र तू एखाद्या प्रसन्न देवतेसारखी अवतरलीयस..


तू अशी पूर्ण भेटलीस ना तेव्हा जगण्याचे अर्थ बदलून गेले......माझ्या प्रत्येक क्षणाक्षणात तू साथ देतेस...आनंदात, अस्वस्थतेत,एकांतात....कधीही कुठेही.कधीकधी सगळ्या जगरहाटीला सोडून मला माझे माझे जगायचे असते तेव्हा तुझी ऊब अंगाखांद्यावरून हळुवार मायेची शाल होऊन लपेटून घेते...नको असतात कधीकधी कुठल्याच भूमिका, कुठल्याही जबाबदाऱ्या... अगदी एखादा क्षण 'आई'पणातूनही मोकळा हवा असतो...अगदी प्रत्यक्ष वेगळे नाही होता आले, कुठे दूर जाता नाही आले..तरी तुझ्या सोबत किती मुक्त रानोमाळी भटकता येते...माझ्या एकाकीपणात माझी खरी सोबती तूच असतेस.


मला म्हणून आवडत नाहीत कृत्रिमतेचे स्पर्श  झालेले जाणिवांना...ढवळाढवळ झाली ना की तुझ्या माझ्या संवादात एक भिंत येते..ती भिंत नको असते मला.मी कधीच तुझ्याशी अप्रामाणिक होणार नाही.....प्रत्येकाला एक चांगला मित्र किंवा मैत्रिण असते..अशी व्यक्ती जिच्याशी काहीही बोलता येतं कुठलीही व्यवहारिक तमा न बाळगता.. पण व्यक्तींना मर्यादा असतात.कुठेतरी अडखळतच संवादविश्व...


माझी मात्र तूच सखी आहेस..माझा राग रंग,प्रेम,अस्वस्थता माझी अनियमितता ,माझ्यातलं मृदू स्त्रीपण,माझ्यातली उग्रता सगळं सगळं तू आहे तसं स्विकारतेस...तू ते समजून संवाद करतेस....त्यामुळे तुझ्यापासून विलग होणं आता तरी शक्य नाही...


मातीत सवंगड्यांबरोबर खेळायचे, खोटी भातुकली खरी भातुकली मांडायचे सगळे टप्पे ओलांडलेत मी आता...जगाबद्दल असणारी पूर्वी ची आशा निवळलीय...आता बरंचसं अलिप्तपण आलंय..माझा सामाजिक संवाद फक्त हे प्रकाशित होण्यापुरता..बाकी पुन्हा मी आणि तूच.......हे खूप छान नातं आहे..हे कोणी विस्कटू शकत नाही... तुला माझ्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही..... 


माणसं बदलतात स्वार्थाने वागतात तशी तू कधीच वागत नाहीस.....

एक हिंदोळा सुखाचा ,खिन्न प्रारब्धाने नेला

सुन्न बाभळीच्या नभी,पुन्हा काटेखणी शेला

गेली पावसाची सर,गेली वादळाची हूल

नुरे पहाट गारवा, फक्त वणव्याची झळ....


बघ,अशा अस्वस्थतेत ही तू सहज संवाद करतेस अगदी निस्वार्थी...

आणि मी आनंदाने गुणगुणत असते तेव्हा ही तू येतेस मनमोकळी खेळत.....

छंदाची मज लागली सवय ही आहे दिवाणी नशा

गागागा ललगा मनात म्हणते स्वप्नातही सर्वदा.....


आणि मग...


संध्येच्या सरत्या कृतार्थ समयी भारावती पापण्या 

स्तोत्रातून झरे अभंग करुणा ज्योतीतुनी चेतना...


अशीही तूच येतेस.....माझ्या मनातल्या मौनपक्षांची भाषा फक्त तुला समजते कविते.... मी तुझ्याशी अशी अखंड बोलू शकते..संवाद नसे हा श्वास......


लिना यादव....

...सौख्यसंजीवनी🌹🍀

टिप्पण्या