प्रेमाचा मोरपिशी दिवस......
प्रेम म्हटलं की कृष्ण आठवतोच आणि कृष्ण म्हटलं की मोरपीस... ! आणि प्रेमाचे क्षण मोरपिशीच असतात ना म्हणून म्हटलं प्रेमाचा मोरपिशी दिवस...!आज प्रेमदिनी प्रेमाची अनेक रूपं न्याहाळताना प्रथम मनात अवतरला तो कृष्णरंग...मोहक निळाई...ही निळाई मोहमयी काव्य घडवते देहात आणि डोळ्यात मोर नाचतात..अनंत डोळे फुटतात त्या मोरपंखांना...त्यांना दिसतं ते फक्त प्रेमच..
प्रेम जडलं की अंतर्बाह्य स्वरूपच बदलून जातं त्या त्या जीवाचं.माणसाचंच असं नाही .निसर्गातली किती एक वैभवी अस्तित्वं ही फक्त ह्या प्रेममयी निरागसतेनं स्वतःला समर्पित करतात या अनंत अवकाशात..शिशिराच्या बोचऱ्या थंडीत होणारी झाडांची पानगळ, मायेने या वसुंधरेवर उबेचं पांघरूण घालत असते.तिच्या कायेला जपण्यासाठी आपला देह झाडून तिच्या देहावर देह अंथरतात ही झाडं....!एखाद्या स्वयंभू शिवलिंगावर अनंत काळ अभिषेक करणारा जलस्रोत पाहिलाय ना तुम्ही.कुठल्या मायेचं हे जग.ना कुठली वाच्यता ना कुठला युगायुगांचा शीण.सतत देहसमर्पण.अविरत वाहती अमर्याद प्रितीची नित्य अर्घ्ये..
जगणं सुंदर करणारी विलक्षण विलक्षण अद्भुत किमया म्हणजे प्रेम....! गर्भात बीज रुजलं की हळुवार पोटावरून हात फिरवणारी आई..ती प्रेमात असते त्या बाळाच्या. त्याची क्षणोक्षणी वाट पहात असते..ते बाळ जन्माला येतं तेव्हा डोळेभरून आपलाच अंश न्याहाळते..त्याला गोंजारते,कुरवाळते.गालावर गाल घासते.किती हजारदा गोड मुके घेते त्या तान्हुल्याचे.किती गोंडस दिसतात ती रूपं तेव्हा.. ते बाळही वात्सल्याच्या आधीन असतं आणि ती आईही..वेल्हाळ दिसतात ना मायलेकरं..एक मधुर ओलावा झिरपत असतो या प्रेमात पडलेल्या जीवांच्या रंध्रारंध्रातून....
अवघं आयुष्य भारून टाकण्याची अपार मंत्रशक्ती प्रेमात सामावलेली आहे.प्रेम आहे निसर्गाच्या प्रत्येक संरचनेचा आद्यस्तंभ..विराट ब्रम्हांडाचा श्वास..म्हणून तर हे निसर्गचक्र अविरत फिरतं.मूक प्रेम करतात ही नक्षत्रं एकमेकांवर.
मायेने,करुणेने जे जिंकता येतं ते कुणाला शस्त्रअस्त्रांचा धाक दाखवूनही जिंकता येत नाही..भक्तीच्या वाटेवर जे 'आर्त' साधकाला भिडतं ते प्रेमच.ज्ञानेश्वर म्हणतात तसं, विश्वाचे जे आर्त माझ्या मनी प्रकाशले....त्यांच्या हृदयी समस्त चराचर सृष्टीबद्दल अपार करुणा पाझरू लागली आणि त्यांनी हे शब्द लिहिले.. त्यांच्या भावभक्तीची अवस्था इतकी परमोच्च बिंदूवर पोहचली की नकळत ते गौळण लिहितात...भवतारकु हा कान्हा वेगी भेटवा गे । चांदवो चांदणे । चापे वो चंदनु । देवकीनंदनु वीण अणू नावडे वो..केवढी ही आर्तता.ही निव्वळ भक्ती नाही. हा प्रेमभक्तीरस.
प्रेमाची असंख्य रूपं आहेत..ती कधी मातृपितृ वात्सल्यातून दिसतात.. तर कधी चांदण्याच्या झुल्यावर झुलणा-या प्रियकर प्रेयसीच्या मुग्ध मिठीतून..एखाद्या गाय वासराच्या हालचालीतून.तर कधी बाबाकडे हट्ट करणाऱ्या, गाल फुगवून मुसमुसणा-या छोट्याश्या लेकीच्या अश्रूंतुन..संसार सजवणा-या पत्नीच्या रुपातून, आजीच्या सुती पदरातून..मऊ रांधलेल्या स्वयंपाकातून जे काही ओघळतं स्निग्ध ,सौम्य ,मधाळ जठराग्नी शांतवणारं ते सगळं प्रेमच ना हो.
'मेरे तो गिरिधर गोपाल दुसरा न कोई' हे म्हणणारी 'मीरा' तिच्या कित्येक हजार वर्ष आधी जन्माला आलेल्या कृष्णावर फक्त त्याची मूर्ती छातीशी धरून कसं हो प्रेम करते..वाळवंटाच्या रूक्ष प्रांगणात हे प्रीतीचं चांदणं कसं नभाळून येतं.सगळे अडथळे ,उंबरठे ओलांडून ती मीरा कृष्णमय होते.कुठल्याही विषाची बाधा तिला होत नाही..ते विष निष्प्रभ होतं इतकी मधुराप्रिती तिच्या आत विलसत असते..जगाचं भान विसरून कृष्णावर वेड्यासारखं प्रेम करणारी ही मीरा कळायला देहापल्याड जावं लागतं.
'शबरीची माया' तिची उष्टी बोरं खाल्ली ना रामरायाने.किती ही रूपं एकाच भावनेची..कृष्णावर प्रेम करणारं अवघं गोकुळ, त्याच्या बाळलीला पाहण्यासाठी आतुर गवळणी, रास खेळताना भान हरपलेल्या गोपिका,अनयाशी लग्न होऊनही कृष्णराधा राधाकृष्ण म्हणून जी निव्वळ कृष्णमय झाली ती राधा.अगदी वेगळं उदाहरण घेऊया का..! आपल्या नृत्य कलेवर आकंठ प्रेम करणारी सुधाचंद्रन..पायाच्या अधूपणावर मात करते नृत्य प्रेमातून.. इतकी जिद्द यायला तितकं प्रेम असावं लागतं ना आपल्या कलेवर ,श्रद्धा स्थानावर. मग ते काहीही असो.ते मातीत रूजवलेलं एखादं रोपटं असो वा एखादी कला किंवा प्रियकर असो वा आराध्य दैवत.जीव ओतावा लागतो .देशासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारे जवान त्या देशप्रेमाची काय तोड आहे का हो..आपल्या माणसांसाठी स्वराज्याचं स्वप्न पाहणारे शिवराय, या मातृभूमीसाठी जन्म वाहून घेण्याची वृत्ती कुठून झिरपली त्यांच्या रक्तात..प्रेमच ना हे...या प्रेमाला कुठल्या एका व्याख्येत मांडता येतच नाही.
या अलौकिक उर्जांच्या मूळाशी जी स्पंदनं असतात ती म्हणजे प्रेम,माया.ऋतूंचं बदलणं,प्राजक्ताचं बहरणं,चाफ्याचा कोवळा रंग,दवबिंदूंच ओघळणं..चांदण्याचं टिमटिमणं..सूर्याचं नित्य तेजाळणं..पृथ्वीचं त्याच्या कक्षेत फिरणं ह्या सगळ्याच्या अंतरंगी आहे ते एकच संगीत,एकच छंद,एकच काव्य ते म्हणजे प्रेम...!
प्रेमात हरवलेले जीव असे तहानभूक विसरून स्वमग्न असतात.. त्यांच्या अवघ्या अस्तित्वात एक बहरलेला ऋतू असतो.वात्सल्याच्या रसाने ओथंबलेले हे बहर नेहमीच सुंदर दिसतात.फुलं सडा होऊन अंगण सजवतात.. तर सूर्य क्षितिजावर केशरी उधळण करतो..मेघांची चिंब बरसात मातीला सुखावते..तर गाभाऱ्यातली घंटा अनंताच्या पायी आपला मधुर घंटारव समर्पित करते..ते तितकच असतं तिच्याजवळ तेही ती मुक्त उधळते..चंद्र त्याच्या किरणांनी धरेवर अखंड सुधारस पाखडतो.तिच्या तापलेल्या कायेला मोहवतो,शांतवतो...हे प्रेमच ना..!
म्हणून करावं प्रेम मीरेसारखं,
कधी चंद्रसूर्यासारखं
ज्ञानेश्वरांसारखं....!!
लिना यादव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा