पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

घोरकष्टोद्धारण श्लोक तिसरा

 ।।श्री गुरुदेव दत्त ।। ।।घोरकष्टोद्धारण दत्तप्रितीकारक स्तोत्र ।। ~ श्लोक तिसरा  पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं । भीतिं क्लेशं त्वं हराsशुत्वदन्यम् ।। त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।।३।। अर्थ - हे ईश्वरा, तू आमचे पाप,ताप ,शारिरीक तथा मानसिक व्याधी ,भिती, क्लेश यांना तुझ्या कृपादृष्टीने सत्वर दूर कर. तुझ्यासारखा दुसरा कोणीही तारणकर्ता मला दिसत नाही. तू माझा या घोर संकटातून उद्धार कर.तुला माझा मनःपूर्वक नमस्कार असो. भावार्थ - आज भावार्थ लिहिण्याआधी या श्लोकाचं पुन्हा पुन्हा पठण करताना,काही वर्षांपूर्वी वाचलेल्या The Gospel of Sri Ramkrishna या ग्रंथातील काही पद्य ओळींची आठवण झाली.. मला त्या ओळी या श्लोकातील भावार्थाशी फार चपखल जुळणा-या वाटल्या. मग संग्रहीत पुस्तक काढून त्या ओळी शोधून इथे घेतल्या आहेत...स्वामी श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या मूळ बंगाली पद्य ओळींचा इंग्रजी अनुवाद या पुस्तकात अनेक ठिकाणी दिला आहे... इंग्रजी ओळी अशा आहेत.. The Master sang :  Mother! Mother! My boat is sinking,here in the ocean of this world; Fiercely the hurricane...

घोरकष्टोद्धारण श्लोक चौथा

 ।। श्री गुरुदेव दत्त ।। ।।घोरकष्टोद्धारण दत्तप्रितीकारक स्तोत्र ।। ~ श्लोक चौथा  नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वत्तो देव त्वं शरण्योsकहर्ता ।। कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।।४।। अर्थ - हे देवा, तुझ्याहून दुसरा कोणी त्राता नाही. तुझ्यासारखा कोणी दाता आणि  पाठीराखाही नाही.तूच दुःखहर्ता आहेस.हे अत्रेया, तुझा अनुग्रह होताच सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात.तू माझ्या वरही अनुग्रह कर..तूच या घोर संकटातून माझा उद्धार कर.तुला माझा नमस्कार असो. भावार्थ -  श्लोक म्हटल्यावर क्षणभर थांबून विचार केला..की आधीच्या ओळीतही हेच म्हटले होते ना.तूच सर्वस्व आहेस मग काय अभिप्रेत असेल इथे वेगळं.मग थोडा अधिक विचार करावा वाटते..स्तोत्र या शब्दाचा सोपा अर्थ स्तुती.. पण नुसतं स्तुती करून भगवंत प्रसन्न होईल का हो याचा विचार केला तर प्रत्येक ओळी ओळीवर मनन चिंतन करता येते.तर प्रत्येक ओळ ही नुसती पाठांतरासाठी पारायणासाठी नाही तर ती आचरणासाठीही आहे..तिचा अर्थबोध घेत आपले आचरणात कुठे चुकते आहे हे समजून घेणेही आवश्यक आहे..नुसत्या स्तुतीपाठातून भगवान साध्य व्हावा...

घोरकष्टोद्धारण श्लोक पाचवा

 ।। श्री गुरुदेव दत्त ।। ।। घोरकष्टोद्धारण दत्तप्रितीकारकस्तोत्र ।। ~ आज या 'स्तोत्रपञ्चकातील' पाचवा श्लोक  धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं । सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।। भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।।५।। अर्थ - हे अखिलानंदमूर्ते श्री दत्तात्रेया, माझी बुद्धी,प्रीती जिथे धर्म आहे तिथे स्थिर होऊन सत्संगात माझी वृत्ती अखंड दृढ राहूदे. (भुक्ति) अर्थात दारिद्यादि संकटापासून मला नेहमी मुक्त ठेव.  माझी आसक्ती फक्त तुझ्या चरणी स्थिर कर.आणि मला सद्गती दे.तुला माझा मनःपूर्वक नमस्कार असून तू माझी या घोर संकटातून मुक्तता कर.. भावार्थ - उपासनेसाठी लागणारे सूक्ष्म बारकावेच खरतर इथे प्रार्थनेतून मागितले आहेत. शुद्ध बुद्धीचे वरदानच मागितले आहे जेणेकरून अज्ञानातून येणारे अडथळे आपोआप नष्ट होतील. भक्तीचा स्वास्थ्यकारक प्रवास मागितला आहे आणि त्यासाठीच दारिद्यादि विवंचनेपासून मला दूर ठेव अशी प्रार्थना सद्गुरुंजवळ केली आहे. माझे मानसिक  तथा शारीरिक स्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी जितके किमान गरजेचे आहे तितक्या अन्नधान्य वस्त्रादि गरजांची पूर्तता न...

आभार घोरकष्टोद्धारण स्तोत्र

 आभार कसे म्हणू.आभार म्हणताना नकळत स्वतःकडे क्रेडिट घेतल्यासारखं होईल. परंतु तुम्ही सगळ्यांनी घोरकष्टोद्धारण स्तोत्राच्या भावार्थाचा मनोभावे वाचनानंद घेतलात याचा अर्थ दत्तगुरुंचरणी सेवा पोहचली इतकेच म्हणेन..ब-याच मित्रमैत्रिणींनी अनेक समूहावर ते पुढे पोस्ट केले त्याबद्दल  मनापासून 🙏🏻🌹🙏🏻 मार्गशीर्ष महिना आला की आईची प्रकर्षाने आठवण होते.ती अगदी पावलोपावली सगळीकडे दिसू लागते.आईची जन्मतिथी आणि पुण्यतिथी दोन्ही मार्गशीर्षातच.ती जाऊन आता जवळजवळ  चोवीस वर्षे झाली..माझ्या वयाची अगदीच पंधरा सोळा वर्षे इतका अल्पसहवास लाभला मला तिचा..पण तिची आठवण खूप ठळक आहे हृदयात.तिचं देवभोळेपण,श्रद्धाळू जगणं,शांत स्वभाव हे इतक ठळक होतं मला तर त्या रुपाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही रूपात ती आठवत नाही. ती याहून वेगळी कधी दिसली नाही वागली नाही.. सकाळी लवकर उठलं की देवपूजा ,मुलं,स्वयंपाक या तीन गोष्टींचाच तिचा दिनक्रम.. नित्यनेमाने रांगोळी करणं छान देवपूजा करणं. वेळेत सौम्य साजुक  स्वयंपाक करणं हे इतकच तिला माहीत. स्वयंपाक आटपला की सतत पारायण स्तोत्रपठण हेच असायचं..किंवा अक्षरशः कित्येक वह्या ...

कांक्षा

 जेव्हा... सुचते ना कविता ना सुचती मज ओळी  ढवळते घोर मी, चित्त आतले जाळी.... तेव्हा जराजरा सुचलेले....🍂🍀 अलवार निखळतो हिरवळला शिनगार थरथरे गुलाबी मोह लाजरा भार देहात सळसळे स्निग्ध मिठीची कांक्षा बिलगला चंद्र का ? धरा लांघते कक्षा हा वेग नदीचा संथ कशाने झाला की कुरवाळित ती प्रवाहात वाळूला एकांत भोगतो डोह त्यागुनी भाषा ना खुणा उमटती ना कुठल्याही  रेषा शिशिरात बोचरा मत्त वाहतो वारा घन निळ्या धुक्याचा वेढुन मुग्धपिसारा आल्हाद विलसतो दिशादिशांच्या वक्षा बिलगला चंद्र का ? धरा लांघते कक्षा धमन्यात पसरते नशेत भिजली धुंदी हा ऋतू मोकळा पानगळीची सर्दी सांदीतुन निथळे ऊब हवीशी माया बहरते प्रितीची लाजलाजुनी काया देहात सळसळे स्निग्ध मिठीची कांक्षा बिलगला चंद्र का? धरा लांघते कक्षा लिना यादव

कृष्णार्पण

कृष्ण कृष्ण रे सावळा निळे निळे श्याम रुप मुकुटात मोरपीस सांगी आत्म्याचे स्वरूप   कृष्ण कृष्ण रे रंगारी उधळितो भावरंग होई दुःखाचा विसर देह भक्तीत गं दंग कृष्ण कृष्ण रे मुरारी फुंकी अवीट बासरी सूर चंद्रात नहाती विरे मोह षट् अरि कृष्ण कृष्ण रे सांगाती सखा श्वासांचा सोबती कळी उमले प्राणाची ब्रम्हांडाची अनुभूती लिना यादव

कवितेच्या ओळी....

उर्मीतुन उठती लाटा लाटांवर झुलते स्पंदन स्पंदातुन मुक्त उमलते शब्दांचे हिरवे चिंतन फुलण्याचा ध्यास सुगंधी श्वासांच्या ओल्या भाळी अन ओठांवरती येती कवितेच्या निर्मळ ओळी... तृष्णेची एक शलाका तळपते अंतरंगात अवकाश झळकते अवघे उजळते आतले चित्त संपृक्त स्वरांच्या रांगा वृत्तीला देती टाळी अन ओठांवरती येती कवितेच्या निर्मळ ओळी... ग्रीष्मात तापली माती विरहाच्या तीव्र झळांनी हिरवळली घोर प्रतिक्षा मन-भिजल्या मेघसरींनी मौनाच्या नाजुक वेणा छंदाला देती हाळी अन ओठांवरती येती कवितेच्या निर्मळ ओळी... बेचैनी अव्यक्ताच्या व्याकुळते खोल तळाशी श्रद्धेच्या यमुनाकाठी गहिवरती अक्षर राशी क्षण एक बोलका होतो अश्रूंनी दुर्लभ वेळी अन ओठांवरती येती कवितेच्या निर्मळ ओळी... पानावर अक्षरमाया ओघळते कातरवेळी अन ओठांवरती येती कवितेच्या निर्मळ ओळी.... लिना यादव

माये गोदावरी

 कातळावर पाय ठेवला आणि माझं वर्तमानच जणू बदललं.. क्षणार्धात समोर चित्र तरळलं डोळ्यासमोर..नदीच्या काठावर उभा असलेला श्रीराम हो रामच दिसतोय ना हा....सुंदर, उंच, रुंद देह..सतेज रूप.लांबसडक हात..मी पहातच राहिले हरखून त्या रुपाला भावविभोर होऊन....!!आजूबाजूला सगळं कसं रूप मनोहर दिसतय..प्रवाहाचं हे अनंत  वहाणं..त्यातलं मधुर संगीत..पहाटेचं धुकं..काठावरच्या झाडाफुलांची पानांची सळसळ....पक्ष्यांचं किलबिलणं..आकाशात सुंदर राजहंसांची रांग माळेसारखी विहरतेय....त्यांची फडफड भिरभिरणं  मला स्पष्ट ऐकू येतंय....प्रवाहाच्या एका संथ उत्तर कोपऱ्यात फुललेली निळसर कमलफुलं आतुरलीत श्रीरामाच्या पावलांवर स्वतःला वाहून घेण्यासाठी..तीही वा-याच्या मदतीने झुकतायत वारंवार काठाकडे, ओढल्यासारखी..... आणि तो रामही त्या नितळ वहात्या प्रवाहाकडे डोळेभरून पहातोय...त्याचं ते पवित्र रूप मीही डोळ्यात साठवतेय.खांद्यावर रुळणारे किंचित लांब केस.तो तेजस्वी चेहरा...सगळं समोर चलचित्रासारखं दिसतंय... न रहावून मी काहीशी पुढे सरकते..मनात किंचितशी जाणीव तरळली वर्तमानाची..फक्त किंचितच... मी तर या काठावरच्या राऊळातील  मूर...

रे मना सांभाळ हे ध्यास सारे....

 प्रकाशाच्या मंदावलेल्या वेळा अधिकच सुस्तावतात.. क्षितिजावरचा शेवटचा केशरी ओघळ अजूनही रेंगाळतो..निशेच्या गूढ छटांमधे विरघळतानाही स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी चाललेला किती हा अट्टाहास!!    मनाचही तसंच असतं ना जेव्हा ते रमतं सुखद आठवांच्या क्षणांमधे...रेंगाळत रहातं या केशरी ओघळासारखं त्या पुसलेल्या आठवणींच्या खुणा जपण्यासाठी.. मनाच्या वाळूवर कितीएक अक्षरांनी कोरलेली आठवणींची शिल्पं तशीच असतात ताटकळत उभी असतात  त्यांचे आकार धरून, रंग धरून स्वतःला जपत.....!! वर्तमानाच्या लाटा किती प्रयत्नशील असतात या स्मृतीशिल्पांना विस्कटून मोडायला.एकावर एक नवीन लाटा मनाच्या किनाऱ्यावर आदळतात, फेसाळत जुन्या खुणांचा रंग पुसण्यासाठी.... पण काही शिल्पं खूप दृढ असतात..काही स्वप्नं फक्त स्वप्नं नसतात..काही आठवणी फक्त आठवणी नसतात भूतकाळात विरून जाणा-या....तर त्या असतात श्वास वर्तमानाचे....ध्यास घेऊनच पाय रोवून उभ्या असतात या आठवणी, ही स्वप्नशिल्पं...त्यांना वेध असतात उषःकालाचे....ओढावलेल्या रात्रीचा गूढ रंग, वर्तमानाचा आवेग त्यांचं अस्तित्व संपवू शकत नाही...भविष्याच्या पहाटेचा सोनेरी कळस त्यां...